(संगमेश्वर / एजाज पटेल)
एसटी महामंडळाचे ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य केवळ बसवर लिहिलेले शब्द नसून नुकतेच ते एसटी कर्मचाऱ्यांच्या कामातूनही दिसून आले. संगमेश्वर येथे धावत्या एसटीमध्ये एका नऊ वर्षांच्या चिमुरडीची प्रकृती अचानक बिघडल्याने निर्माण झालेल्या प्रसंगात चालक-वाहक, वाहतूक नियंत्रक विश्वास फडके आणि प्रवाशांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्या मुलीला वेळेवर उपचार मिळाले. या घटनेतून माणुसकीचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले.
धावत्या बसमध्ये प्रकृती बिघडली
रत्नागिरी-चिपळूण मार्गावरील एसटी बस संध्याकाळच्या सुमारास संगमेश्वरहून पुढे जात होती. बसमध्ये मंडणगड येथे जाणारे एक गरीब कुटुंब त्यांच्या नऊ-दहा वर्षांच्या मुलीसह प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अचानक त्या मुलीची प्रकृती खालावली आणि तिला आकडी येऊ लागली. मुलीची अवस्था पाहून बसमध्ये क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
प्रवाशांनी दिला धीर
मात्र, बसमधील प्रवाशांनी शांतपणे परिस्थिती हाताळली. मुलीच्या पालकांना धीर देत “काळजी करू नका, दवाखाना जवळ आहे,” असे सांगून त्यांनी आधार दिला. प्रवासाला उशीर होईल याचा विचार न करता सर्वांनी मुलीला तातडीने दवाखान्यात नेण्याच्या चालक-वाहकांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
बस वळवली थेट रुग्णालयाकडे
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चालक आणि वाहकाने क्षणाचाही विलंब न करता बस नियोजित मार्गाऐवजी थेट संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाकडे वळवली. प्रवाशांनी भरलेली लालपरी जणू त्या मुलीसाठीच ‘प्राणवाहिनी’ ठरली. त्यामुळे तिला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले आणि पुढील अनर्थ टळला.
विश्वास फडकेंची संवेदनशीलता
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर येथील वाहतूक नियंत्रक विश्वास फडके तात्काळ ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून मुलीच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि उपचार व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करून घेतली.
‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’
मुलीच्या पालकांची आर्थिक परिस्थिती पाहून फडके यांनी त्यांना धीर देत, “काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे सांगितले. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी त्या कुटुंबाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली.
संकटाच्या क्षणी एसटी चालक-वाहक, प्रवासी आणि विश्वास फडके यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.

