(खेड / वार्ताहर)
ग्रुप ग्रामपंचायत तुळशी खुर्द-बुद्रुकचे माजी सरपंच, भरणे विभागाचे शिवसेना विभागप्रमुख तसेच न्यू इंग्लिश स्कूल, खवटी आणि पी. के. दरेकर ज्युनिअर कॉलेजचे विद्यमान अध्यक्ष दिलीप श्रीपतराव राणे यांची रत्नागिरी जिल्हा डोंगरी विभाग विकास समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत असून, डोंगरी भागाच्या विकासाला या नियुक्तीमुळे गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दिलीप राणे यांनी अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, निस्वार्थ समाजसेवा, प्रामाणिक नेतृत्व आणि विकासाभिमुख कार्याची दखल घेत त्यांची या महत्त्वाच्या समितीवर निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे.
तुळशी खुर्द-बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांनी दुर्गम भागात विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उल्लेखनीय काम केले. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण आणि लोकाभिमुख विकासकामांना त्यांनी प्राधान्य दिले. तसेच न्यू इंग्लिश स्कूल, खवटी आणि पी. के. दरेकर ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
शिवसेनेच्या संघटनात्मक कामातही त्यांनी अनेक वर्षे सक्रिय भूमिका बजावत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. युवकांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत मजबूत संपर्क आणि शांत, संयमी स्वभावामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाचा लाभ आता जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या विकासासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आपल्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना दिलीप राणे म्हणाले, “ही जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी नेतृत्वाचा ऋणी आहे. शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी कायम माझ्यावर विश्वास ठेवून मला मार्गदर्शन केले. विशेषतः योगेशदादा कदम यांच्या पाठिंब्यामुळेच मला ही संधी मिळाली. डोंगरी भागातील नागरिकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन.”
राणे यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगरी भागातील विकासकामांना अधिक चालना मिळेल, तसेच स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समिती प्रभावी भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

