(चिपळूण)
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वाद पेटला आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर रविवारी चिपळूण दौऱ्यात जोरदार टीका केली. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राणे म्हणाले की, सपकाळ यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर बोलू नये. आमच्या महाराजांच्या स्मारकासंदर्भात बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. त्यांच्या तोंडात असे शब्द शोभत नाहीत, अशी जहरी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
चिपळूणमध्ये काँग्रेसकडून नगर परिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील उमेदवारांसाठी निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सपकाळ यांनी कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता निलेश राणे आक्रमक झाले.
राणे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक ती माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. सुमारे ३० एकर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू असून गरज भासल्यास वाढीव जमीनही घेतली जाईल. निधीची कोणतीही कमतरता नसून स्मारक उभारणीसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे. महाराजांच्या सन्मानाबाबत आम्हाला कोणाकडून शिकवण घेण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. या वेळी झालेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले असून स्मारकाच्या मुद्द्यावरून पुढील काळात आणखी आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कार्यक्रमास शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिवसेना तालुकाप्रमुख संदेश आयरे, माजी नगरसेवक परिमल भोसले यांच्यासह अनेक नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

