(रत्नागिरी)
रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणे लावण्यात आलेले धार्मिक फलक रुग्णालय प्रशासनाने काढून टाकले आहेत. हिंदु राष्ट्र समन्वय समितीने यासंदर्भात दिलेल्या निवेदनाची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.
रुग्णालयाच्या इमारती व परिसरात ‘इफ्तारी का इंतिजाम’ आणि ‘सेहरी का इंतजाम किया जाएगा’ अशा आशयाचे फलक संपर्क क्रमांकांसह लावण्यात आले होते. हे फलक यंग मेमन वेल्फेअर फाउंडेशन आणि अरमान ग्रुप या संस्थांकडून लावण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
शासकीय नियमांनुसार तसेच भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा रुग्णालय परिसरात विशिष्ट धर्माशी संबंधित प्रचारात्मक किंवा धार्मिक स्वरूपाचे फलक लावण्यास मनाई आहे. ही बाब समितीने रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. फलक तात्काळ काढून टाकावेत आणि भविष्यात अशी बाब घडू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
या निवेदनानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी तातडीने फलक हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित फलक काढून टाकण्यात आले.
यासंदर्भात रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांच्याकडून लेखी पत्र देण्यात आले असून, भविष्यात असे फलक पुन्हा लावले जाऊ नयेत यासाठी रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना कडक सूचना देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे पत्र हेडकॉन्स्टेबल संतोष सावंत यांनी समितीचे कार्यकर्ते प्रभाकर खानविलकर यांना दिले.
दरम्यान, शासकीय रुग्णालयासारख्या सार्वजनिक व संवेदनशील ठिकाणी नियमांचे पालन करणे आवश्यक असून, यापुढे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

