( मुंबई )
मुंबईसह राज्यात बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, याच मुद्द्यावर विधान परिषदेत जोरदार चर्चा आणि वादंग पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारवर गंभीर आरोप करत सखोल कोंबिंग ऑपरेशन आणि स्वतंत्र टास्कफोर्स स्थापनेची मागणी केली. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आकडेवारी सादर करत थेट प्रत्युत्तर दिले.
मुंबईत 237 बोगस जन्म प्रमाणपत्रे रद्द
काही दिवसांपूर्वी नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबईतील विविध झोपडपट्ट्यांमध्ये बांगलादेशी व रोहिंगे घुसखोर बोगस कागदपत्रांच्या आधारे राहत असल्याचा गंभीर आरोप केला होता. महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांना पैसे देऊन बनावट जन्म प्रमाणपत्रे मिळवली जात असल्याचे उघड झाले असून, आतापर्यंत 237 बोगस जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. पुढेही शोधमोहीम तीव्र केली जाणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
“हा राजकीय नाही, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न” – अनिल परब
सभागृहात बोलताना अनिल परब म्हणाले की, “बांगलादेशी घुसखोरी हा राजकीय विषय नसून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. मुंबईत अशी एकही झोपडपट्टी नाही जिथे बांगलादेशी नाहीत. त्यांनी बेकायदेशीर झोपड्या उभारून तिथे कारखाने सुरू केले आहेत. हे सर्व स्थानिक पोलिसांना आणि महापालिकेला माहिती नाही का?” परब यांनी पुढे टास्कफोर्स स्थापन करून प्रत्येक झोपडपट्टी आणि वस्तीत सखोल तपासणी, कोंबिंग ऑपरेशन आणि कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करण्याची मागणी केली. “पुढील तीन महिन्यांत सरकार ही जबाबदारी घेणार का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
योगेश कदमांचे प्रत्युत्तर: “कारवाई सुरू आहे, आकडे बोलके आहेत”
अनिल परब यांच्या आरोपांना उत्तर देताना योगेश कदम म्हणाले की, मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पाच कर्मचाऱ्यांची विशेष टीम नेमण्यात आली आहे. या टीम्स फक्त बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करत असून, एटीएसच्या मदतीने संयुक्त कारवाई सुरू आहे. “अनिल परब यांच्याकडे जर अधिक माहिती असेल, तर त्यांनी ती द्यावी. त्या आधारे आम्ही तात्काळ कारवाई करू,” असे म्हणत त्यांनी परब यांना प्रत्युत्तर दिले.
आकडेवारीने राजकीय आरोपांना छेद
योगेश कदम यांनी सभागृहात आकडेवारी सादर करत सांगितले की, 2021 मध्ये फक्त 109 बांगलादेशी घुसखोर हद्दपार करण्यात आले तर 2025 मध्ये 2,376 बांगलादेशी घुसखोर हद्दपार करण्यात आले. “कोणाच्या काळात जास्त कारवाई झाली, हे आकडे स्पष्ट सांगतात,” असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या काळावर अप्रत्यक्ष टीका केली.
टास्कफोर्सवर सकारात्मक संकेत
योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, संशयावरून थेट कारवाई करता येत नाही. ओळखपत्रांची पडताळणी आवश्यक असते आणि केंद्र सरकारच्या परवानगीनुसार गुन्हा दाखल न करताही हद्दपारीची कारवाई केली जात आहे. “तरीही गरज भासल्यास स्वतंत्र टास्कफोर्स स्थापन करण्याचा विचार सरकार करेल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
या चर्चेमुळे बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, येत्या काळात सरकारकडून कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

