(कोल्हापूर)
कोल्हापूर जिल्ह्यात महाविद्यालयीन ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने 20 वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत चौघांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मुरगूड पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आदित्य बाजीराव शेटके(वय २४, रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), रणजित संभाजी मुधोळकर (वय २९, रा. सोळांकूर, ता. राधानगरी), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (वय २४, रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील (वय २२, रा. बुजवडे, ता. राधानगरी) यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी राधानगरी तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ओळखपत्राच्या बहाण्याने संपर्क
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आदित्य शेटके हा सोळांकुर येथे त्याच्या मामाचा फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय सांभाळत होता. याच व्यवसायाच्या माध्यमातून त्याची ओळख पीडित तरुणीशी झाली. पीडित तरुणी पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून सेमिस्टरचे महाविद्यालयीन ओळखपत्र तयार करण्यासाठी तिने आरोपी आदित्य शेटके याला स्वतःचा फोटो पाठवला होता. त्यानंतर ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने तिला मुदाळ तिट्टा येथे बोलावण्यात आले. आरोपीने तिला मुरगूडमधील तलाव परिसरातील झाडीत नेऊन फोटो काढले आणि ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपीने करवीर तालुक्यातील एका लॉजवर नेऊन तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केले व तिच्यावर अत्याचार केला.
आदित्यसह केलेला अत्याचार सहन केल्यानंतर पीडित तरुणी या नराधमांच्या विळख्यात अडकली होती. आदित्यने इतर मित्रांशी तिची ओळख करून देत धमक्यांच्या आधारे वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रणवगिरीने भीती दाखवत तरूणीला स्वत:च्या कारमधून घेऊन जात एका लॉजमध्ये अत्याचार केला. रणजित मुधोळकरने तरूणीची विक्रम रामचंद्र पाटील याच्याशीही जबरदस्तीने ओळख करून दिली. ओळखीनंतर विक्रम पाटील याने तरूणीला, ‘तुझे पाठीमागील सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून हे प्रकरण मिटवतो,’ असे सांगून पाचगाव येथील लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला.
वेगवेगळ्या लॉजवर नेऊन अत्याचार
तक्रारीनुसार, आरोपी रणजित मुधोळकर याने कोल्हापूर शहरातील लॉजमध्ये नेऊन तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर प्रणवगिरी पालकर आणि विक्रम पाटील यांनीही स्नॅपचॅटवर संपर्क वाढवत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. गेल्या १० महिन्यांपासून हे चौघे मित्र आळीपाळीने पीडितेची वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक शोषण करत होते. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने अखेर मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांना अटक केली.
राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चांना उधाण
या प्रकरणातील काही आरोपी राजकीय कुटुंबांशी संबंधित असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. प्रकरण दडपण्यासाठी काही राजकीय स्तरावरून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा रंगली आहे. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस अधीक्षकांनी स्वतः मुरगूड पोलीस ठाण्यात भेट देत तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणातील आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारचे प्रकार केल्याची चर्चा सुरू असून, आणखी पीडित समोर आल्यास धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मुरगूड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत. आरोपींचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स आणि डिजिटल पुरावे तपासले जात असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध सुरू आहे.

