(नागपूर)
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी पहाटे घडलेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसबीएल एनर्जी लिमिटेड या बारूद निर्मिती कंपनीच्या कारखान्यात सकाळी सुमारे 7 ते 7.30 दरम्यान डेटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 17 कामगारांचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुसंख्य महिला कामगारांचा समावेश आहे.
स्फोटाची तीव्रता प्रचंड, 700 मीटरपर्यंत मलबा फेकला
स्फोट इतका प्रचंड होता की कारखान्यातील इमारतींचा मलबा तब्बल 500 ते 700 मीटर अंतरावर जाऊन पडला. स्फोटानंतर भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाने चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. त्यानंतर बचावकार्याला वेग आला.
कारखान्याची सकाळची शिफ्ट सकाळी 6 वाजता सुरू झाली होती. घटनेच्या वेळी दोन पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली सुमारे 35 कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक माहितीनुसार, नॉन-अॅलॉय क्रिमिंग प्लांटमध्ये स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून अनधिकृत प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. सर्व जखमींना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, ‘पेसो’ आणि ‘डिश’च्या तज्ज्ञ पथकांनीही घटनास्थळी दाखल होत तपास आणि मदतकार्य सुरू केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला अत्यंत दुर्दैवी ठरवत मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. संबंधित कंपनीकडूनही स्वतंत्र मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृत कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, सेफ्टी ऑडिटची मागणी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोंढाळी परिसरात वारंवार होणाऱ्या अशा घटनांकडे लक्ष वेधत कामगार सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. सर्व स्फोटक कारखान्यांचे सेफ्टी ऑडिट झाले आहे का, याची तपासणी व्हावी आणि नियमांचे पालन न करणाऱ्या कारखान्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी केली. मृतांच्या कुटुंबीयांना किमान 50 लाख रुपयांची मदत द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात शोककळा पसरली असून पुढील तपास अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

