( नाशिक )
उंटवाडी परिसरातील बाल निरीक्षण गृहातून एका अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल १५ दिवस उलटूनही मुलीचा थांगपत्ता लागलेला नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पीडित मुलीच्या पालकांनी थेट निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांवर मुलीची विक्री केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काय आहे प्रकरण?
सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी ही अल्पवयीन मुलगी २२ मे रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. पालकांनी तात्काळ वावी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. काही दिवसांतच ती पुणे जिल्ह्यात आढळून आली.
यावेळी तिच्यासोबत असणाऱ्या एका तरुणावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तर पीडित मुलीला न्यायप्रक्रियेच्या पूर्ततेसाठी नाशिकमधील उंटवाडी येथील बाल निरीक्षण गृहात एक महिन्यासाठी ठेवण्यात आले होते.
दरम्यान, १५ दिवस उलटून गेले तरी ही मुलगी निरीक्षण गृहातून बेपत्ता आहे. विशेष म्हणजे, या गृहामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा असूनही संबंधित वेळचा कोणताही ठोस पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. दिवस-रात्र कर्मचारी तैनात असलेल्या अशा ठिकाणी मुलगी नेमकी कशी बेपत्ता झाली, हे एक कोडं आहे.
पालकांचा संताप; आत्मदहनाचा इशारा
घटनेनंतर हतबल झालेल्या मुलीच्या पालकांनी माध्यमांसमोर आपली व्यथा मांडताना निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले. “मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी आहेत, सीसीटीव्ही आहेत, तरीही मुलगी बाहेर निघून गेली कशी? १५ दिवसांपासून पोलीस आणि प्रशासन गप्प का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुलीची विक्री झाल्याची शक्यता व्यक्त करत, तपास लवकर न झाल्यास निरीक्षण गृहासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून चौकशी गतीने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे.