(रत्नागिरी)
नाशिक येथे झालेल्या विश्व मराठी संमेलन अंतर्गत आयोजित ‘प्रकाशनातील बदलते प्रवाह’ या परिसंवादात रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी प्रकाशन क्षेत्रात होणारे बदल अपरिहार्य आणि आवश्यक असल्याचे ठामपणे मांडले. बदलत्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी नव्या युगातील डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पटवर्धन म्हणाले की, आज प्रकाशन क्षेत्राचे स्वरूप लक्षणीयरीत्या बदलले आहे. विविध विषयांवरील ग्रंथ मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होत आहेत. ग्रामीण साहित्य, भारतीय संस्कृती, संरक्षण क्षेत्रातील डावपेच, पौराणिक संदर्भांची नव्या पद्धतीने मांडणी, तसेच अनुवादित पुस्तके यांचा समावेश वाढत आहे. युवा वाचकांना आकर्षित करायचे असेल तर डिजिटल माध्यमांचा प्रकाशन क्षेत्रात अधिक प्रभावीपणे वापर केला पाहिजे.
महाराष्ट्रातील अनेक लहान-मोठ्या शहरांत ग्रंथविक्रीची दुकाने उघडण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मोठ्या शहरांचा अपवाद वगळता आजही अनेक ठिकाणी अशी दुकाने दुर्मिळ आहेत. वाचक आणि प्रकाशक यांचा थेट संपर्क साधण्यासाठी ही व्यवस्था सर्वत्र उभी राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रत्नागिरी वाचनालयाच्या द्विशतकी प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकिर्दीचा आढावाही मांडला.
या परिसंवादाचे संयोजन शुभदा फडणवीस यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात प्रकाशन क्षेत्रातील बदल स्वाभाविक असून तंत्रज्ञान, कार्यपद्धती आणि जीवनशैलीतील बदलांचा त्यावर थेट परिणाम होत असल्याचे सांगितले. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी, विशेषतः युवा पिढीला प्रेरणा देणाऱ्या नव्या व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या परिसंवादात सुषमा दातार, लतिका भानुशाली आणि प्रकाश पारखी यांनीही आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. रावसाहेब थोरात सभागृह येथे मोठ्या संख्येने उपस्थित श्रोत्यांनी या परिसंवादाचा मन:पूर्वक आस्वाद घेतला.

