( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील मौजे विल्ये येथे बौद्धजन विकास कमिटी, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ आणि मानका आप्पा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थांसह विविध सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सिताराम भागा कांबळे यांच्या हस्ते धम्मध्वज व अनिता जयवंत कांबळे यांच्या हस्ते पक्षध्वज फडकवण्यात आला. अध्यक्ष राहुल कांबळे आणि महिला अध्यक्षा मेधा सुवेज कांबळे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. बुद्ध पूजापाठ देवदत्त प्रकाश कांबळे आणि विजय तुकाराम कांबळे यांच्या माध्यमातून पार पडला. कार्यक्रमात बालक नील भालचंद्र कांबळे, विराज कांबळे आणि कबीर कांबळे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे विशेष मार्गदर्शन करताना सुवेज कांबळे यांनी शालेय शिक्षणात खरी इतिहासदृष्टी रुजविण्याची गरज अधोरेखित केली. “आपल्या धार्मिक कार्यक्रमांमधून प्रबोधनात्मक विचार मांडले गेले पाहिजेत. खऱ्या इतिहासाची ओळख करून घेऊन त्याचा प्रसार करणे ही आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. तसेच आधुनिक शिक्षणासोबत बौद्ध मूल्यांचा अभ्यास आणि आचरण आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी धम्मदान म्हणून आद. जयवंत विश्राम कांबळे यांनी खीरदान केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात आयु. राहुल गंगाराम कांबळे यांनी समाजएकता, शिक्षण आणि प्रबोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आयु. नरेश तुकाराम कांबळे यांनी केले. समारंभाच्या यशस्वी आयोजनामुळे विल्ये परिसरात धम्मभावनेचा माहोल अनुभवायला मिळाला.

