(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरात बँकेने जप्त केलेल्या घराचे कुलूप तोडून बेकायदेशीररीत्या आत प्रवेश करत अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दानिश जमीर पटेल (वय ३९, रा. मजगाव रोड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असून, अख्तर फकीर महंमद काझी (रा. पावस, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीतील माहितीनुसार, नाचणे परिसरातील दोन मिळकती कोकण मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेने जप्त केल्या आहेत. मात्र, या जप्त मिळकतीमध्ये संशयिताने बेकायदेशीररीत्या प्रवेश करत मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून नुकसान केले. त्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याला धमकी देत संशयिताने घरात प्रवेश केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, जिल्हाधिकारी व कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी बुधवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

