(रत्नागिरी/सिंधुदुर्ग)
महावितरणकडून घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या प्रणालीमुळे दिवसाच्या वेळेत वीज वापरावर प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपयांपर्यंत सवलत मिळत असून, १ जुलै २०२५ पासून याचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांना मिळू लागला आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १ लाख ७६ हजार ६१७ ग्राहकांना गेल्या नऊ महिन्यांत तब्बल १ कोटी ४३ लाख ७७ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांना १ कोटी ४ लाख ७५ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांना ३९ लाख २ हजार रुपयांचा लाभ झाला आहे.
स्मार्ट टीओडी मीटर महावितरणकडून ग्राहकांकडे मोफत बसवले जात असून, या मीटरमुळे वीज वापराचे स्वयंचलित मासिक रीडिंग घेतले जाते. त्यामुळे बिलिंगमध्ये अचूकता येऊन तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराची माहिती दर अर्ध्या तासाला मोबाईलवर पाहता येते.
टीओडी प्रणालीअंतर्गत सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरावर सवलत मिळते. त्यामुळे वॉशिंग मशीन, गिझर, इस्त्री, एअर कंडिशनर यांसारख्या जास्त वीज वापर करणाऱ्या उपकरणांचा वापर या वेळेत केल्यास ग्राहकांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो.
महिनानिहाय आकडेवारीनुसार, जुलै ते मार्च या कालावधीत दोन्ही जिल्ह्यांतील ग्राहकांना सातत्याने सवलत मिळाली असून, मार्च महिन्यात सर्वाधिक लाभ नोंदवला गेला आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २०२५ ते २०३० या कालावधीसाठी टीओडी दर मंजूर केले असून, सवलतीचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवले जाणार आहे. त्यानुसार २०२६ पर्यंत ८० पैसे, २०२७ मध्ये ८५ पैसे, २०२८-२९ मध्ये ९० पैसे आणि २०३० मध्ये प्रतियुनिट १ रुपया सवलत मिळणार आहे.
स्मार्ट टीओडी मीटर प्रीपेड नसून पोस्टपेड पद्धतीवर आधारित आहे. म्हणजे ग्राहकांनी आधी वीज वापरायची आणि त्यानंतर मासिक बिल भरायचे आहे. याशिवाय, सौर ऊर्जा प्रकल्प असलेल्या ग्राहकांना वापरलेल्या व उर्वरित विजेचा अचूक हिशोब ठेवणेही या मीटरमुळे शक्य होत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना वीज वापराचे योग्य नियोजन करता येत असून, आर्थिक बचतीसह पारदर्शक बिलिंगचा लाभही मिळत आहे.

