(दापोली / प्रतिनिधी)
दापोली तालुक्यातील हर्णे–राजवाडी येथे जयंत भागोजी दुबळे (वय ८०) या वृद्धाने जमीन विक्रीत मिळायचे ४० लाख रुपये न मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी दापोली पोलिसांनी दोन व्यक्तींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.
३० ऑक्टोबर रोजी सकाळी दुबळे यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे त्यांच्या नातवाला आढळून आले. त्यानंतर तातडीने दापोली पोलिसांना कळविण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली असून, त्यात दुबळे यांनी संदेश शंकर कदम आणि अमोल भालचंद्र गुरव (दोघे रा. हर्णे) यांनी जमीन विक्रीतील उर्वरित ४० लाख रुपये न दिल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. पोलिस तपासात उघड झाले की, दुबळे गेल्या दीड वर्षांपासून या रकमेची मागणी करत होते. वारंवार संपर्क साधूनही पैसे न मिळाल्याने ते मानसिक तणावाखाली होते. शेवटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
या प्रकरणी पोलिसांनी संदेश कदम (४८) व अमोल गुरव (३९) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली व आवश्यक दिशा–निर्देश दिले.

