(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बुधवारी सायंकाळी आकाशात एकामागोमाग एक सरकणाऱ्या सुमारे २० ते २५ प्रकाशमान वस्तूंनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पश्चिमेकडून दक्षिणेकडे सरकत जाणारी ही चकचकीत ‘रेषा’ अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात टिपली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ‘धूमकेतू की काही वेगळे?’ अशा चर्चांना उधाण आले.
नारायण मळी परिसरासह सावर्डे, संगमेश्वर आणि लांजा भागातील नागरिकांनी हा दृश्यानुभव घेतल्याचे सांगितले. सूर्यास्तानंतर आकाश निरभ्र असल्याने ही प्रकाशमान माळ स्पष्टपणे दिसून आली. काही क्षणांत एकसंध रेषेत पुढे सरकणाऱ्या या वस्तूंमुळे अनेकांच्या मनात कुतूहलासोबतच संभ्रमही निर्माण झाला. दरम्यान, खगोल अभ्यासक बाबासाहेब सुतार यांनी या घटनेमागील वैज्ञानिक कारण स्पष्ट केले. त्यांच्या मते, ही Starlink उपग्रहांची शृंखला असून ती SpaceX या कंपनीकडून अवकाशात सोडण्यात आलेली आहे. जगभर ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी हे कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केले जातात. सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या सुमारास सूर्यकिरणांचा परावर्तित प्रकाश उपग्रहांवर पडल्याने ते पृथ्वीवरून तेजस्वी बिंदूंसारखे चमकताना दिसतात.
अवकाशात निश्चित कक्षेत फिरणारे हे उपग्रह सुरुवातीच्या काळात एका रेषेत दिसतात. आकाश स्वच्छ असल्याने ही ‘उपग्रहांची माळ’ स्पष्टपणे पाहता आली, असे सुतार यांनी सांगितले. अशा घटना नियमित स्वरूपाच्या असून त्यांचे वेळापत्रकही उपलब्ध असते. त्यानुसार आकाशनिरीक्षकांना International Space Station सारख्या अवकाशातील वस्तूंचे दर्शनही घडू शकते.
आकाशात चमकणाऱ्या या रेषेमुळे काही काळ नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले असले, तरी हा वैज्ञानिक आणि तांत्रिक भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा दृश्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, अवकाशाविषयीची उत्सुकता आणि कुतूहल वाढीस लागते, असेही सुतार यांनी नमूद केले.

