(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे झालेल्या कथित दुर्लक्षामुळे संगमेश्वर येथे गंभीर प्रकार घडला. संगमेश्वर पोलीस ठाण्यासमोर काम सुरू असलेल्या मार्गावरील मोठ्या खड्ड्यात मुंबईकडे जाणारी एसटी बस रुतल्याने प्रवाशांना तब्बल चार तास अडकून पडावे लागले. या घटनेमुळे महामार्गावरील कामाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरोधात प्रवासी व स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी एसटी चालकाची काम सुरू असलेल्या सेवा रस्त्याकडे दिशाभूल झाली. संबंधित ठिकाणी रस्ता बंद असल्याची सूचना, बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक किंवा रिफ्लेक्टर्स नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे चालकाने बस पुढे घेतल्यानंतर ती मऊ माती व मोठ्या खड्ड्यांमध्ये अडकली. काही अंतर पुढे गेल्यानंतर बसची पुढील दोन्ही चाके खोल खड्ड्यात रुतली आणि बस एका बाजूला झुकून जागेवरच अडकली. त्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने त्या वेळी पाऊस नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पावसाच्या परिस्थितीत बस आणखी खोल रुतून गंभीर अपघात होण्याची शक्यता होती, अशीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
घटनेनंतर चालक, वाहक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी मिळून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. महिला व ज्येष्ठ प्रवाशांनीही चाकांखाली आधार मिळावा म्हणून दगड गोळा करून खड्ड्यात टाकले, मात्र हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
अखेर घटनास्थळी हायड्रा मशीन बोलावण्यात आली. पहिल्या मशीनलाही बस बाहेर काढण्यात यश आले नाही. त्यानंतर दुसरी हायड्रा मशीन मागवून दोन्ही मशीनच्या सहाय्याने बचावकार्य राबविण्यात आले. एका मशीनने बसचा पुढील भाग उचलला, तर दुसऱ्या मशीनने मागील बाजूने ओढून अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे चार तास लागले.
महामार्गावरील कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी केली आहे. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित ठेकेदार कंपनी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी महामार्गावरील सर्व कामांमध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

