( मुंबई )
मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या व माजी नगरसेविका तेजस्वीनी घोसाळकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीत (भाजप) जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील राजकारणाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
घोसाळकर कुटुंब हे ठाकरे कुटुंबाशी निष्ठावंत मानले जाते. विनोद घोसाळकर हे दहिसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून, सध्या मनीषा चौधरी या तेथील आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतरही विनोद घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवली होती. मात्र, त्यांच्या सूनबाई तेजस्वीनी घोसाळकर यांनी आता वेगळा राजकीय मार्ग स्वीकारला आहे.
तेजस्वीनी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांचे दुर्दैवी निधन झाले होते. त्याआधी अभिषेक घोसाळकर हे २०१२ ते २०१७ या कालावधीत वॉर्ड क्रमांक १ मधून नगरसेवक होते. त्यांच्या पश्चात तेजस्वी घोसाळकर या २०१७ पासून आतापर्यंत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. मात्र, वॉर्ड क्रमांक १ साठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर, त्या वॉर्ड क्रमांक ७, ८ किंवा संधी मिळाल्यास वॉर्ड क्रमांक २ मधून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याआधीच त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे.
भावनिक पोस्टद्वारे राजीनाम्याची घोषणा
ठाकरे गट शिवसेनेचा राजीनामा देताना तेजस्वीनी घोसाळकर यांनी भावनिक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. “आज आपल्याशी संवाद साधताना माझं मन प्रचंड उद्विग्न झालं आहे. आयुष्यात असा क्षण कधी येईल आणि असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही केली नव्हती. आज मन जड आहे… शब्द अपुरे पडत आहेत, पण हा संवाद आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच, राजकारण, जनसेवा आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना अपार अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप प्रवेशापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तेजस्वीनी घोसाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर आज त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. BMC निवडणुकीआधी तेजस्वीनी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात असून, मुंबईतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

