( दापोली )
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत सातबारा उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या महिला लोकसेवकाचे नाव असून त्या नानटे येथे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून कार्यरत आहेत.
ACBकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मित्राने मौजे तेरेवायंगणी येथे संयुक्तपणे जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार नोंद करून त्याची प्रत देण्यासाठी श्रद्धा बंडे यांनी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर बुधवारी, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदार कार्यालय, दापोली येथे सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना श्रद्धा बंडे यांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली, सापळा अधिकारी अविनाश पाटील (पोलीस उपअधीक्षक, ACB रत्नागिरी) तसेच निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे आणि पथकातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली. या प्रकरणी संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

