( मुंबई )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रियेनंतर तब्बल 80 लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याचा दावा चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. लाभार्थ्यांची विविध निकषांनुसार पडताळणी सुरू असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अपात्र लाभार्थ्यांची नेमकी संख्या जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेतील 80 लाख महिलांना ई-केवायसीनंतर अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, 80 लाखांचा आकडा केवळ ई-केवायसी न केलेल्या महिलांचा नसून त्यामध्ये उत्पन्न मर्यादा ओलांडणाऱ्या महिला, वयोमर्यादा पूर्ण झालेल्या लाभार्थी, वाहन नोंदणी असलेले अर्जदार तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही समावेश आहे.
त्यांनी सांगितले की, ई-केवायसी प्रक्रिया ऑगस्ट 2025 पासून सुरू करण्यात आली होती. मात्र ही प्रक्रिया फक्त लाडकी बहीण योजनेसाठी नसून राज्यातील सर्व थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनांसाठी अनिवार्य आहे. त्यामुळे ई-केवायसीचा मुद्दा वेगळा आणि पात्रतेची पडताळणी वेगळी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोणाचाही अर्ज बाद झालेला नाही
आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणत्याही लाभार्थीचा अर्ज कायमस्वरूपी बाद करण्यात आलेला नाही. विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार काही अर्जदार वय, उत्पन्न किंवा इतर पात्रता निकष पूर्ण करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी असल्याची माहिती आरटीओ विभागाकडून प्राप्त झाली आहे. याशिवाय काही महिलांना इतर शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्याचेही पडताळणीत समोर आले आहे. तर काही लाभार्थ्यांनी विहित मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
लाभ बंद झाल्यास तातडीने संपर्क साधा
ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही लाभ बंद झाला आहे, अशा लाभार्थींनी महिला व बालविकास विभागाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन तटकरे यांनी केले. संबंधित प्रकरणांची पुन्हा तपासणी करून पात्र महिलांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पात्र महिलांना लाभापासून वंचित ठेवणार नाही
काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अशा सर्व प्रकरणांची फेरपडताळणी सुरू असून तांत्रिक अडचणींमुळे कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची काळजी शासन घेत असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

