( नवी दिल्ली )
NEET-UG 2026 पुनर्परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सध्याच्या पेन-पेपर पद्धतीऐवजी CBT स्वरूपात घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने हे प्रकरण तातडीचे नसल्याचे स्पष्ट करत पुढील सुनावणी जुलै महिन्यासाठी निश्चित केली.
न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली होती. सुनावणीदरम्यान खंडपीठाने सुरुवातीलाच याचिकाकर्त्याच्या वकिलांना आपण ही याचिका स्वीकारण्यास उत्सुक नसल्याचे स्पष्ट केले.
याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. सत्यम सिंग यांनी 21 जून रोजी होणारी NEET-UG 2026 पुनर्परीक्षा प्रत्यक्ष केंद्रांवर पेन-पेपर पद्धतीने न घेता CBT पद्धतीने घेण्याची मागणी न्यायालयासमोर मांडली. मात्र न्यायालयाने यापूर्वीही अशा प्रकारच्या मागण्या फेटाळून लावल्याचे सांगत या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
“आम्ही याआधीही अशा अनेक याचिका फेटाळल्या आहेत. परीक्षा रद्द झाल्यानंतर आता पुनर्परीक्षा आयोजित केली जात आहे. संबंधित यंत्रणांवर असलेला ताण आणि परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल,” असे निरीक्षण न्यायमूर्ती नरसिम्हा यांनी नोंदवले.
वकिलांनी पुन्हा CBT पद्धतीच्या मागणीवर भर दिल्यानंतरही न्यायालयाने तातडीची सुनावणी नाकारली. सुट्टीनंतर जुलैमध्ये हे प्रकरण नियमित सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ही याचिका राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मधील सुधारणांसंदर्भातील दुसऱ्या याचिकेशी जोडण्यात आली आहे.
दरम्यान, NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा रद्द करण्याची वेळ येणे ही विद्यार्थ्यांसाठी “मनस्तापदायक” घटना असल्याचे म्हटले आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भावना, मेहनत आणि भविष्य या परीक्षेशी जोडलेले असल्याने या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाने उत्तरदायित्व निश्चित करण्यावर विशेष भर देत, दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच कोणत्याही मोठ्या गैरप्रकाराला सामोरे जावे न लागलेल्या UPSC च्या परीक्षा व्यवस्थापनातून धडा घेण्याचा सल्लाही NTA ला दिला.
सुनावणीदरम्यान केंद्र सरकारकडून न्यायालयाला माहिती देण्यात आली की, NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासावर स्वतः पंतप्रधान लक्ष ठेवून आहेत आणि तपासात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत.

