(रत्नागिरी)
७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जांभरुण ग्रामपंचायतीत दरवर्षीप्रमाणे ध्वजारोहणाचा मान गावाचे प्रथम नागरिक, सरपंच गौतम सावंत यांना असतो. मात्र, यंदा त्यांनी एक वेगळा आणि प्रेरणादायी निर्णय घेत, हा मान गावातीलच गुणवान विद्यार्थी कुणाल दत्ताराम सावंत (कोतवडे हायस्कूल – ९३% गुण, प्रथम क्रमांक) याला बहाल केला.
हा उपक्रम केवळ सन्मानाचा नव्हता, तर गावातील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा ठरला. या प्रसंगी कुणाल सावंत, आर्यन धोपट, आर्य शिंदे आणि समिता धोपट या विद्यार्थ्यांचा उपसरपंच श्री. मंदार थेराडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात “गुण, मेहनत आणि यशाचा सन्मान” या मूल्यांना योग्य न्याय मिळाला. गावकऱ्यांनी सरपंचांच्या या निर्णयाचे मनापासून कौतुक केले आणि ध्वजारोहणाचा क्षण अभिमानाने, टाळ्यांच्या गजरात पार पडला.
कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

