( पुणे / लातूर )
देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत लातूरमधील निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक केली आहे. सखोल चौकशीनंतर पुण्यात त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी दिल्लीला हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे आता NEET पेपरफुटीत ‘लातूर कनेक्शन’ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, याच प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांची तब्बल आठ तास कसून चौकशी करण्यात आली. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील त्यांच्या कार्यालयांवर CBIने छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
मनीषा वाघमारेच्या चौकशीतून कुलकर्णीपर्यंत पोहोचली CBI
CBIच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केमिस्ट्रीचे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हे NTAच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होते. पुण्यातील आरोपी मनीषा वाघमारे हिच्या चौकशीतून CBIला कुलकर्णीपर्यंत पोहोचता आले. एप्रिल 2026 च्या अखेरच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी मनीषा वाघमारेच्या मदतीने विद्यार्थ्यांना संपर्क केला. त्यानंतर पुण्यातील स्वतःच्या घरी स्पेशल कोचिंग क्लास घेत विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारे संभाव्य प्रश्न, पर्याय आणि योग्य उत्तरे सांगितल्याचा संशय CBIने व्यक्त केला आहे.
पुण्यात चौकशी, नंतर दिल्लीला रवाना
गुरुवारी CBIने कुलकर्णी यांना लातूरमधून ताब्यात घेतलं होतं. पुण्यात सखोल चौकशी केल्यानंतर शुक्रवारी त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली. तपास यंत्रणांनी त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेल्याची माहिती मिळत आहे. कुलकर्णी हे चार वर्षांपूर्वी प्राध्यापक पदावरून निवृत्त झाले होते. पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या संपर्कातूनच ते या प्रकरणात सक्रिय झाल्याचा संशय आहे.
RCC क्लासेसचे संचालकही CBIच्या रडारवर
CBIचे पथक सध्या लातूरमध्ये ठाण मांडून असून शुक्रवारी सकाळपासून RCC क्लासेसचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांची सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली. यासोबतच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील त्यांच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले. देशभरातील विविध ठिकाणी CBIने गेल्या 24 तासांत धाडी टाकून महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. या सर्व साहित्याचा तांत्रिक आणि फॉरेन्सिक तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
21 जूनला होणार NEET पुनर्परीक्षा
3 मे रोजी झालेल्या NEET परीक्षेवर पेपरफुटीचे सावट आल्यानंतर देशभरातील जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी राहिले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 21 जून रोजी NEET पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांना यावेळी 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार असल्याचं सांगितलं आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार
रद्द झालेल्या परीक्षेचं शुल्क विद्यार्थ्यांना परत दिलं जाणार असून नव्या परीक्षेसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडण्याची मुभाही देण्यात आली आहे. तसेच पुढील वर्षापासून NEET परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयही केंद्र सरकारने जाहीर केला आहे.
आतापर्यंत 7 जणांना अटक
CBIने या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. यामध्ये राजस्थानमधील मंगीलाल बिनवाल, दिनेश बिनवाल, विकास बिनवाल, हरियाणातील यश यादव आणि नाशिकचा शुभम खैरनार यांचा समावेश आहे. याशिवाय पुण्यातील मनीषा वाघमारे आणि नाशिकमधील धनंजय लोखंडे यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींना दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.

