(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील तळवडे–पाचल येथील यशस्वी हॉटेल व्यावसायिका सौ. संजीवनी संजय रायबागकर यांना मंथन फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय उद्योगश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योग क्षेत्रात दाखवलेली सातत्यपूर्ण गुणवत्ता, ग्राहकाभिमुख सेवा आणि महिला उद्योजक म्हणून केलेली उल्लेखनीय कामगिरी याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक मार्गदर्शक सांध्वी माताजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार शरद मोरे, शिवराज विद्यालयाचे संस्थापक प्रा. किसनराव कुराडे, ॲड. शैलेश पंडित यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यावेळी सांध्वी माताजी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांनी आत्मविश्वासाने उद्योजकतेकडे वाटचाल करावी, समाजात सकारात्मक बदल घडविण्याची ताकद उद्योग क्षेत्रात आहे, असे प्रतिपादन केले. प्रा. किसनराव कुराडे यांनी ग्रामीण भागातील उद्योजकांनी स्थानिक रोजगारनिर्मितीवर भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर ज्येष्ठ पत्रकार शरद मोरे यांनी सौ. रायबागकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या व्यवसायातील शिस्त, गुणवत्ता आणि चिकाटी यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंथन फाउंडेशनचे आयोजक सागर शेळके यांनी केले. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.
या पुरस्कारामुळे राजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सौ. संजीवनी रायबागकर यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

