(संगमेश्वर)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी आणि शासनाच्या जाचक अटींवर मात करत शाळेचा शाश्वत विकास साधण्यासाठी कारभाटले–शृंगारपूर येथील प्रचितगड माध्यमिक विद्यालयच्या पाठीशी संपूर्ण पंचक्रोशी ठामपणे उभी राहिली आहे. रविवारी झालेल्या विशेष सभेत परिसरातील सात गावांतील ग्रामस्थांनी शाळेसाठी एकत्र येत ऐतिहासिक निर्णय घेतला.
स्व. विलास दादा होडे यांच्या विचारांना उजाळा
सभेच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय विलास दादा होडे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली ही शैक्षणिक संस्था आज ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे. हा वारसा जपण्यासाठी कारभाटले, शृंगारपूर, नायरी, निवळी, तिवरे, अणदेरी आणि कोंड–उमरे या गावांतील ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी एकमुखी निर्धार व्यक्त केला.
लाखोंच्या मदतीची घोषणा; दातृत्वाचा आदर्श
या सभेत शिक्षणासाठी मदतीचा ओघ पाहायला मिळाला. शाळेचे माजी विद्यार्थी विनोद म्हस्के यांनी सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. तर मोहिनीद्दीन जैनुद्धीन पाटणकर यांनी शाळेच्या विकासकामांसाठी ₹१ लाखांची भरीव देणगी जाहीर केली. या दातृत्वाबद्दल पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे.
मान्यवरांचे मार्गदर्शन आणि लोकसहभागावर भर
सभेच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र पोमेंडकर होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “शिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया आहे. शाळा टिकली तरच गावाचे भवितव्य सुरक्षित राहील. यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक आहे.” यावेळी संस्थेचे संचालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या सभेस संस्थेचे संचालक श्री. सुभाष पवार, श्री. सुभाष होडे, श्री. रोहिदास पोमेंडकर, श्री. बाळू होडे, श्री. विलासजी डिके, श्री. विनोद म्हस्के, श्री. बाळकृष्णा घडशी, श्री. दैवत पवार, श्री. नबील तांबू, श्री. राहुल गुरव, श्री. प्रदीप सोलकर, श्री. विनोद पवार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सातही गावांतील सरपंच, पोलीस पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या बैठकीला सातही गावांतील सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या प्रगतीसाठी दरवर्षी अशाच प्रकारे संघटित प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शाळेच्या प्रगतीसाठी स्थानिक स्तरावर दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी श्री. नबील तांबू यांची एकमताने निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर अत्तार यांनी केले, तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक धनाजी बेंद्रे यांनी मानले. या सभेमुळे प्रचितगड माध्यमिक विद्यालयाच्या वाटचालीला नवी ऊर्जा, नवी दिशा आणि भक्कम लोकाधार मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

