(खेड)
राज्यात नव्या संच मान्यतेमुळे अनेक जिल्ह्यांतील पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरले असून, त्याचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. रत्नागिरीत समाजशास्त्र व भाषा विषयाचे सुमारे ९६० पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरले असून, त्यांच्या भवितव्याबाबत सध्या अनिश्चितता निर्माण झाली आहे.
या अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळावा आणि या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांची भेट घेतली. अण्णा कदम यांनी शिक्षकांची भूमिका आणि अडचणी सविस्तरपणे समजून घेतल्या.
यानंतर शिक्षक समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी दूरध्वनीद्वारे योगेशदादा कदम यांच्याशी संपर्क साधून अतिरिक्त पदवीधर शिक्षकांबाबतची वस्तुस्थिती मांडली. यावर राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून मंत्रालयात शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाची भेट आयोजित केली जाईल, तसेच संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या समाजशास्त्र व भाषा विषयाच्या शिक्षकांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
त्या अनुषंगाने येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिष्टमंडळ राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहे. अतिरिक्त पदवीधर शिक्षकांच्या प्रश्नावर संवेदनशीलतेने विचार करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याबद्दल शिक्षक समितीतर्फे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे आभार मानण्यात आले आहेत.
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, सल्लागार सुनील सावंत, कार्याध्यक्ष परशुराम पेवेकर, अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, उपाध्यक्ष बबन साळवी, तुकाराम काताळे, संघटना प्रवक्ते शैलेश पराडकर यांच्यासह संजय गडाळे, बबन मोरे, येडू केकान, राजेश भागणे, विलास कासार, शशिकांत भुवड, राजाराम दरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

