(नवी दिल्ली)
भारताने रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. शेतातील टाकावू अवशेषांपासून ‘बायो-बिटुमेन’ म्हणजेच जैविक डांबर तयार करून त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आयोजित तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी ‘शेतातील कचऱ्यापासून रस्त्यांपर्यंत: पायरोलिसिस प्रक्रियेद्वारे बायो-बिटुमेन’ या अभिनव संकल्पनेचे सविस्तर स्पष्टीकरण दिले. त्यांनी या शोधाला भारताच्या रस्ते बांधणी क्षेत्रातील ऐतिहासिक मैलाचा दगड म्हटले.
पायरोलिसिस तंत्रज्ञान म्हणजे काय?
पायरोलिसिस ही अशी आधुनिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत शेतीतील अवशेष जसे की पेंढा, धापा आणि पराली उच्च तापमानावर प्रक्रिया करून त्यांचे रूपांतर बायो-बिटुमेनमध्ये केले जाते. हे बायो-बिटुमेन पारंपरिक पेट्रोलियम-आधारित डांबराचा प्रभावी आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरते.
४,५०० कोटींची वार्षिक बचत
रस्ते बांधणीत केवळ १५ टक्के बायो-बिटुमेनचा वापर केला, तरी भारताला दरवर्षी सुमारे ४,५०० कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होणार आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. तसेच दरवर्षी पराली जाळल्यामुळे होणारे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी संधी, ग्रामीण भागात रोजगार
या तंत्रज्ञानामुळे टाकावू शेतीकचरा आता राष्ट्रीय संपत्तीत रूपांतरित होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या अवशेषांना योग्य दर मिळेल, ग्रामीण भागात छोटे प्रक्रिया उद्योग सुरू होतील आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या दिशेने हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.
शास्त्रज्ञांचे कौतुक
या ऐतिहासिक यशाबद्दल नितीन गडकरी यांनी CSIR च्या शास्त्रज्ञांचे तसेच प्रकल्पाला पाठबळ देणारे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचे अभिनंदन केले. हे यश शाश्वत विकास, आत्मनिर्भर भारत आणि पर्यावरण संरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची ठाम भूमिका दर्शवते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

