(रत्नागिरी)
हातखंबा तिठा येथे वळणावर वॅगनार कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोन तरुण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला असून काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम संतोष घवाळी (वय ३०) आणि राहूल सुनिल पालेकर (वय २६, दोघेही रा. खेडशी नाका, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. दोघे दुचाकी (एमएच-०८-एएच-८८७७) वरून रत्नागिरीहून निवळीच्या दिशेने जात होते. त्याच वेळी वॅगनार कार (एमएच-०३-बीवाय-७३३१) रत्नागिरीहून पालीकडे जात असताना हातखंबा तिठा येथील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
अपघाताची तीव्रता मोठी असल्याने दुचाकीवरील दोघेही तरुण जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची नोंद घेऊन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

