(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथे हापूस आंबा बागेत काम करत असताना नेपाळी कामगार झाडावरून पडून जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रबहाद्दूर लक्ष्मण गिरी (वय ५०, सध्या रा. चिंचखरी, रत्नागिरी; मूळ रा. नेपाळ) असे जखमी कामगाराचे नाव आहे. मावळंगे येथील मनिंदर विकास पाटील यांनी कराराने घेतलेल्या हापूस आंबा कलमांच्या बागेत गिरी हे मोहोर आलेली फांदी हलविण्याचे काम करत होते. यावेळी अचानक फांदी तुटल्याने त्यांचा तोल गेला आणि ते झाडावरून खाली कोसळले.
या अपघातात त्यांच्या कमरेला मुका मार लागला असून डाव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती लक्षात घेता अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची नोंद जिल्हा रुग्णालय पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

