(रत्नागिरी)
कराटे दो असोसिएशन महाराष्ट्र (KAM) यांच्या मान्यतेने होणाऱ्या राज्यस्तरीय सिनियर स्त्री-पुरुष कराटे अजिंक्यपद स्पर्धा 2025-26 साठी रत्नागिरी जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. कराटे असोसिएशन रत्नागिरी या अधिकृत जिल्हा संघटनेमार्फत ही निवड चाचणी दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती.
या निवड चाचणीत रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 10 कराटे खेळाडूंनी सहभाग नोंदवला. 21 वर्षाखालील वयोगटात 55 किलोखालील वजन गटातील फाईट प्रकारात कु. तेजस दीपक जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला, तर काता प्रकारात कु. दिव्य सुनील यादव याने प्रथम क्रमांक मिळवला. 84 किलोवरील वजन गटातील फाईट प्रकारात कु. वेदांत महेंद्र सावंत याने प्रथम क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
21 वर्षावरील सिनियर गटात 67 किलोखालील वजन गटात श्री. प्रशांत चंद्रकांत जाधव यांनी काता आणि फाईट या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. विजयी ठरलेले सर्व खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्यस्तरीय स्पर्धेत करणार आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी उपलब्ध होणार असून, 21 वर्षावरील कराटे खेळाडूंना 5 टक्के शासकीय आरक्षणाचाही लाभ मिळणार आहे.
या निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन माननीय तालुका क्रीडा अधिकारी प्रितम कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष जावेद मिरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन जिल्हा संघटनेचे सचिव सुरज बने, खजिनदार अरुण बेग तसेच सदस्य रितेश बेग, नौशीन कापडी, अयान मिरकर, प्रथम बेग, रिया माचकर आणि ध्रुव बसणकर यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. अखेरीस सर्व पदाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

