(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहराजवळील कोकणनगर येथील क्रांतीनगर परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उनाड बैलाने भरधाव धावत येत एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गौरव पवार (वय २८, राहणार शीळ, रत्नागिरी) या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रस्त्यावर मोकाट फिरणारा बैल अचानक भरधाव वेगाने दुचाकीसमोर आल्याने हा अपघात घडला. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला. डोक्याला गंभीर मार लागल्याने परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर परिसरामधील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी तरुणाला मदत केली. याचवेळी किर्तीनगर येथील एका रिक्षाचालकाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत क्षणाचाही विलंब न करता जखमीला स्वतःच्या रिक्षेतून रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे, त्याने कोणतेही भाडे न घेता मानवतेचा आदर्श ठेवला. त्याच्या या तत्परतेचे उपस्थित नागरिकांनी मनापासून कौतुक केले आहे.
दरम्यान, कोकणनगर परिसरात उनाड जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाट गुरांचा मुक्त संचार सुरू असून अनेक वेळा अपघाताच्या घटना घडूनही प्रशासनाची ठोस कारवाई मात्र अद्याप दिसून आलेली नाही. केवळ आश्वासनांवर समाधान मानण्यापेक्षा या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
उनाड जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई, जनावरांची तातडीने पकड, सुरक्षित गोशाळांमध्ये व्यवस्था आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित केल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. निष्काळजीपणामुळे निरपराध नागरिकांचा जीव धोक्यात येत असेल, तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

