(गणपतीपुळे / वैभव पवार)
पावसाळ्यात समुद्राला आलेले उधाण, वेगवान वारे आणि उसळणाऱ्या प्रचंड लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी गणपतीपुळेसह आरे-वारे आणि भाट्ये समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना समुद्रात जाण्यापासून रोखण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार गणपतीपुळे ग्रामपंचायतीने गुरुवार, ९ जुलैपासून समुद्रकिनाऱ्यावर मोठी दोरी बांधून पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध लागू केले आहेत.
याबाबत माहिती देताना ग्रामपंचायतीच्या प्रशासक कल्पना पकये यांनी सांगितले की, पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार समुद्राची धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर उतरू नये यासाठी संपूर्ण किनाऱ्यावर दोरी बांधण्यात आली असून, सुरक्षेसाठी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जीवरक्षकांकडून पर्यटकांना समुद्रातील उधाण, तीव्र लाटा आणि बदलणाऱ्या समुद्री प्रवाहांबाबत माहिती दिली जात असून, समुद्रात न उतरता सुरक्षित अंतरावरूनच निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पावसाळी पर्यटनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना भेट देतात. मात्र, या काळात समुद्रातील प्रवाह वेगाने बदलत असल्याने आणि लाटांचा जोर वाढल्याने अपघाताचा धोका अधिक असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत समुद्राच्या पाण्यात उतरू नये, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, समुद्रकिनाऱ्यांशी संबंधित ग्रामपंचायतींना या संदर्भातील लेखी आदेशही लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
फोटो : पावसाळ्यातील धोकादायक परिस्थितीमुळे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने बांधलेली सुरक्षा दोरी.
(छाया : विधी पवार, गणपतीपुळे)

