(मुंबई)
राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारांना १० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर ठरवण्यात आली आहे. अर्ज मागे घेण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २ डिसेंबर रोजी मतदान होईल, तर ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.
मात्र, या निवडणुकीच्या प्रक्रियेत एक मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण, २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी (Teacher Eligibility Test) परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत शिक्षकांचे निवडणूक प्रशिक्षण सत्र ठेवल्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
४.७६ लाख परीक्षार्थींपैकी सुमारे १ लाख शिक्षक कार्यरत
या वर्षी टीईटी परीक्षेला तब्बल ४ लाख ७६ हजार परीक्षार्थी बसणार आहेत. त्यापैकी सुमारे १ लाख परीक्षार्थी हे राज्यातील विविध शाळांमधील कार्यरत शिक्षक आहेत. हेच शिक्षक निवडणुकीच्या काळात मतदान अधिकारी, सहाय्यक अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी दोन प्रशिक्षण सत्रं घेतली जातात. मात्र, जर त्यापैकी एक सत्र २३ नोव्हेंबरला ठेवलं गेलं, तर शिक्षकांसाठी ती परिस्थिती अत्यंत कठीण ठरू शकते.
शिक्षक संघाचा राज्य निवडणूक आयोगाला इशारा
“टीईटी परीक्षा ही शिक्षकांच्या करिअरमधील अत्यंत निर्णायक परीक्षा आहे. त्यामुळे त्या दिवशी कोणतेही निवडणूक प्रशिक्षण ठेवू नये,” अशी मागणी पुणे प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नितीन मेमाणे यांनी केली आहे. त्यांनी पुढे सांगितले, “२३ नोव्हेंबर रोजी शिक्षक निर्धास्तपणे परीक्षा देऊ शकतील, अशी परिस्थिती निर्माण करावी. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेलाही अडथळा येऊ नये. तसेच २ डिसेंबरच्या निवडणुकीत हेच शिक्षक मतदार म्हणून सहभागी होणार असल्याने त्यांचा मतदानाचा हक्कही अबाधित राहिला पाहिजे.”
टीईटी उत्तीर्ण करणे अनिवार्य — सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार देशभरातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शिक्षकांना पुढील दोन वर्षांत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. अन्यथा संबंधित शिक्षकांना सेवानिवृत्ती घ्यावी लागेल, असा आदेश आहे. तसेच, पदोन्नतीसाठीही टीईटी पास असणे आवश्यक आहे. या आदेशामुळे राज्यातील हजारो शिक्षक तणावाखाली आहेत. त्यामुळे आता टीईटी परीक्षा आणि निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम एकाच दिवशी आल्यास शिक्षक द्विधा मनःस्थितीत सापडतील, अशी स्पष्ट चिंता व्यक्त केली जात आहे.

