(मुंबई)
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या दुसऱ्या पर्वातून दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे यांना वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकरकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध ज्योतिर्विद शरद उपाध्ये यांनी एक फेसबुक पोस्ट करत निलेश साबळेवर टीका केली आहे. “निलेश साबळेच्या डोक्यात हवा गेली होती,” असं विधान करत त्यांनी त्याच्या वर्तणुकीबाबत आपल्या अनुभवांची माहिती दिली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये निलेश साबळेबाबत नाराजी व्यक्त करताना त्याच्या व्यावसायिक वागणुकीवर आणि दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
आदरणीय नीलेशजी साबळे,
आपल्याला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी ११ वा. पोहोचलो. पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत.
स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलेसे केले नाही.आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा साऱ्यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल.
निलेश साबळेला शोमधून का वगळण्यात आलं?
‘चला हवा येऊ द्या’ हा शो १८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झाला होता. गेल्या दहा वर्षांत या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि अपार लोकप्रियता मिळवली. निलेश साबळेने या शोचं दिग्दर्शन व सूत्रसंचालन करताना भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांच्यासह एक मजबूत टीम तयार केली होती. मात्र, गेल्या वर्षी शो थांबवण्यात आला. त्यानंतर निलेश साबळेने कलर्स मराठीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!!’ या नव्या शोमध्ये प्रवेश केला. परंतु, हा शो फार काळ टिकला नाही.
आता ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वात निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडे अनुपस्थित आहेत, हे प्रेक्षकांच्या लक्षात आलं आहे. नव्या प्रोमोमध्ये गौरव मोरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे यांच्यासह काही नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. सूत्रसंचालक म्हणून निलेश साबळेच्या जागी आता अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. दरम्यान, शरद उपाध्ये यांच्या पोस्टनंतर निलेश साबळेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच शोमधून वगळल्याच्या निर्णयावरही त्यांनी कोणतंही विधान केलेलं नाही.

