(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या ९० व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे विशेष सुगम संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २० मे रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे हा सांगीतिक कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती कार्यालय प्रमुख अधीर गढपाले आणि कार्यक्रम प्रमुख डॉ. सुनील गायकवाड यांनी दिली.
आकाशवाणीच्या ९० वर्षांच्या प्रवासानिमित्त राज्यातील विविध आकाशवाणी केंद्रांतर्फे सांस्कृतिक आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून रत्नागिरी केंद्रानेही या उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्याअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या सुगम संगीत मैफिलीत गायिका वैदेही करंबेळकर आणि गायक अभिजीत नांदगावकर आपल्या सुमधूर आवाजात लोकप्रिय सुगम गीते सादर करणार आहेत.
या कार्यक्रमात महेश दामले (हार्मोनियम), राजू किल्लेकर (सिंथेसायझर), उदय गोखले (व्हायोलिन) आणि प्रथमेश देवधर (तबला) हे वादक कलाकार साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन आकाशवाणीच्या ज्येष्ठ निवेदिका निशा काळे आणि कश्मीरा सावंत करणार आहेत. ध्वनीव्यवस्थेची जबाबदारी उदयराज सावंत यांच्याकडे असून कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विवेक वानखडे पाहत आहेत.
रसिकांसाठी या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला असून रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफिलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

