( पुणे )
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी BBA, BMS, BBM, BCA, MBA (Integrated) आणि MCA (Integrated) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना 16 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून, यंदा PCM आणि PCB गटातील विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयानुसार, PCM आणि PCB गटाची CET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही BBA, BMS, BBM आणि BCA अभ्यासक्रमांसाठी अर्ज करता येणार आहे. या निर्णयामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन आणि संगणक क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांचे नवे पर्याय खुले झाले आहेत.
ऑनलाइन नोंदणी करताना ही प्रक्रिया आवश्यक
प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे. कागदपत्र पडताळणीसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.
- ई-स्क्रूटिनी (E-Scrutiny): संपूर्ण पडताळणी ऑनलाइन होईल. विद्यार्थ्याला प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.
- प्रत्यक्ष पडताळणी (Physical Scrutiny): विद्यार्थ्यांनी जवळच्या सुविधा केंद्रात उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल.
नोंदणीसाठी शुल्क किती?
CET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणीसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मात्र NRI, OCI, PIO, आखाती देशांतील भारतीय कामगारांची मुले आणि परदेशी नागरिक या श्रेणीतील विद्यार्थ्यांना निर्धारित शुल्क भरावे लागेल. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नसल्याचे CET कक्षाने स्पष्ट केले आहे.
प्रवेशाचे महत्त्वाचे वेळापत्रक
- ऑनलाइन नोंदणी व कागदपत्र अपलोड: 16 जुलै 2026 पर्यंत
- ई-पडताळणी / प्रत्यक्ष पडताळणी: 7 ते 17 जुलै
- तात्पुरती गुणवत्ता यादी: 19 जुलै
- हरकती व तक्रारी नोंदविण्याची मुदत: 20 ते 22 जुलै
- अंतिम गुणवत्ता यादी: 24 जुलै
62 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली CET
यंदा 28 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान झालेल्या BBA, BMS, BBM, BCA, MBA (Integrated) आणि MCA (Integrated) CET परीक्षेला 62,301 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. आता या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन CET कक्षाने केले आहे.

