(जाकादेवी / संतोष पवार)
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डोळ्यांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असून डोळ्यांची काळजी घेणे काळाची गरज आहे. योग्य वेळी डोळ्यांची तपासणी करून चष्मा लागल्यास नियमित चष्मा वापरणे हे त्याहून अधिक महत्वाचे आहे. डोळे आळशी बनता कामा नयेत. आळशी डोळे म्हणजे चष्मा लावूनही ज्यांना दिसत नाही असे डोळे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे वाचन मोबाईलवर करण्यापेक्षा टॅबचा वापर करावा.
आपण ८० ते ९० % ज्ञान डोळ्याने अवगत करत असतो. आयुष्यात डोळे फार महत्वाचे आहेत. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला चष्मा लागला असेल, तर चष्मा लावण्याचा आळस करू नये, डोळे आळशी बनता कामा नये, वाचन करताना डोळे थकता कामा नये. चष्मा लागणे हा रोग नाही तर चष्मा हा डोळ्यांचा आकार आहे, त्यामुळे लहान मुलांना कमी वयात चष्मा लागल्यास विद्यार्थ्यांनी चष्म्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन इन्फिगो आय केअर आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात “माझे डोळे, माझे भविष्य” या विषयावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बालरोग नेत्र विशेषतज्ञ डॉ.प्रदीप देशपांडे यांनी केले.
जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते बोलताना म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांनी डोळ्यांची आवर्जून तपासणी करावी. सर्दी खोकला होईल म्हणून आवळे-चिंच खाणे टाळले जाते. आवळे चिंच डोळ्यांसाठी महत्त्वाचे असलेले घटक आहेत. त्यामुळे लहान मुलांनी कैरी, आवळे, चिंच खाणे आवश्यक आहे, त्यामुळे डोळ्यांची नजर चांगली राहते. डोळ्यांच्या काही समस्या असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मोफत सुविधा पुरविते. मात्र डोळे तपासण्यासाठी सर्वांनीच पुढे यावे, असे त्यांनी आवाहन डॉ प्रदीप देशपांडे यांनी केले. यावेळी त्यांनी आय केअर संस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा यांविषयी माहिती दिली.
यावेळी त्यांच्या समवेत मार्केटिंग पर्सन डॉ.अनिल यादव ,शाळेचे मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, क्रीडाशिक्षक संतोष सनगरे, क्रिडाशिक्षक किशोर नलवडे, केशव राठोड, फोटोग्राफर विशाल बारस्कर, अमित बोले, मंदार रसाळ, संदेश सोनवडकर यांच्यासह अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

