(चिपळूण)
तालुक्यातील कोंडमळा–कामथे सीमेजवळ असलेल्या भैरी मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ३१ मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली असून, चिपळूण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर परिसरातून जात असलेल्या एका रिक्षाचालकाच्या लक्षात रस्त्याच्या बाजूला एक पुरुष बेशुद्धावस्थेत पडलेला असल्याचे आले. त्याने त्या व्यक्तीला आवाज देऊन जागविण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने जवळील ग्रामस्थांना माहिती दिली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व त्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही त्याला ओळखू शकले नाही.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती फिरस्त्या स्वभावाचा असून, गेल्या काही दिवसांपासून तो या परिसरात दिसत होता. वयोवृद्ध व अशक्त प्रकृतीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.