(चिपळूण)
कोकणातील अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, अशी मागणी माजी आमदार शौकत मुकादम यांनी केली आहे.
हवामानातील बदलामुळे लवकर येणाऱ्या भाताच्या (हळवे) लोंब्या नीट धरल्या नाहीत. काही ठिकाणी भाताचे रोप खाली पडले, तर पानतळ भागातील शेतांमध्ये पाणी साचून पिके कुजली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात मुख्यत्वे भात, नाचणी आणि वरी हीच पिके पावसाळ्यात घेतली जातात. याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही.
मुकादम म्हणाले, “राज्यात इतर भागांत पिकांचे नुकसान झाल्यास ज्या निकषांनुसार पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते, त्याच पद्धतीने कोकणातील शेतकऱ्यांनाही न्याय द्यावा. शासनाने या नुकसानीकडे गंभीरतेने पाहावे.”
यावेळी मुकादम यांनी तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांसोबत चिपळूण तालुक्यातील शेतांची पाहणी केली. या पाहणीत माजी उपसभापती राजाभाऊ चाळके, खालील पटाईत, माजी पोलिस पाटील दत्ताराम शिंदे, निलेश कदम, अमित घडशी, योगेश कदम, जिवाजी कदम तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

