(चिपळूण)
थोर इतिहास संशोधक, शिवचरित्रकार आणि संत विचारवंत विजयराव देशमुख उर्फ सद्गुरूदास महाराज यांनी चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट दिली. ‘पत्रभेट’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी महाराज चिपळूणला आले होते.
‘लोटिस्मा’च्या वतीने सहकार्यवाह विनायक ओक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर महाराजांना ग्रंथालयाने साकारलेले रामभाऊ साठे संग्रहालय दाखविण्यात आले. प्रकृती थोडीशी अस्वस्थ असतानाही सद्गुरूदास महाराजांनी प्रत्येक वस्तूविषयी बारकाईने माहिती जाणून घेतली.
यानंतर त्यांनी बाळशास्त्री जांभेकर सभागृहातील तैलचित्रे पाहिली. संस्थेचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांनी संस्थेच्या वतीने उपरणे देऊन महाराजांचा सत्कार केला, तर विनायक ओक यांनी ‘तेजशलाका’ हा ग्रंथ भेट दिला.
मनोगत व्यक्त करताना अरुण इंगवले म्हणाले, “सद्गुरूदास महाराजांनी लिहिलेल्या शिवचरित्र या ग्रंथातील परिशिष्ट विभाग हा अमूल्य ठेवा आहे. त्या परिशिष्टांमुळे हे शिवचरित्र अक्षरशः ‘अक्षरधन’ झाले आहे.”
या वेळी सौ. अर्चना बक्षी, संस्थेचे कर्मचारी तसेच सद्गुरूंच्या शिष्यवर्गातील अनेक जण उपस्थित होते.

