(पाचल / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्त नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या फलकाचे अनावरण शिवप्रेमींच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील मान्यवर, शिवप्रेमी नागरिक तसेच श्रीराम सेवक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाचल येथे महाराजांच्या प्रतिमेवर अभिषेक करून करण्यात आली. त्यानंतर सौंदळ येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिरात श्रीफळ अर्पण करून महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. जयघोषाच्या वातावरणात येथून भव्य दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला.
या रॅलीत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेली ऐतिहासिक वेशभूषा विशेष आकर्षण ठरली. श्रीराम सेवक मंडळाच्या सुयोग्य नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
रॅली रायपाटण येथील होळीचा मांड येथे पोहोचल्यानंतर महाराजांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. त्यानंतर पाचल रिक्षा चालक-मालक संघटनेच्या बहुसंख्य रिक्षांच्या सहभागाने रॅली पुन्हा पाचलकडे मार्गस्थ झाली. अखेर छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचल येथे रॅलीची सांगता झाली. यानंतर ढोल-ताशांच्या गजरात भव्य पायी रॅली काढण्यात आली. या संपूर्ण सोहळ्यात पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिवजयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने वकृत्व स्पर्धा व किल्ला बनविणे स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना बालकांसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ग्रामस्थ, राजापूर पूर्व भागातील सौंदळ ग्रामस्थ मंडळी तसेच शिवगर्जना मित्र मंडळ – आजीवली यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि श्रीराम सेवक मंडळ, पाचल यांच्या उत्तम नियोजनामुळे शिवजयंती सोहळा अत्यंत यशस्वी आणि अविस्मरणीय ठरला.

