(कळझोंडी / अमित कांबळे)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी नं.१ आदर्श प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय पोषण आहारातील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वेशभूषा परिधान करून प्रभातफेरी काढण्यात आली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि विद्यार्थ्यांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
यानंतर शाळेत आयोजित अभिवादन सभेत महाराजांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी विचारमंचावर ग्रामस्थ व वृत्तपत्रकार किशोर पवार, नामदेव वीर, शालेय पोषण आहार विभागाच्या माधवी आग्रे, अंतरा राऊत, शालेय मुख्यमंत्री हर्षदा आग्रे यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थी मनोगत सभेत वेदिका आग्रे, सुदिक्षा शिंदे, शर्वाणी निंबरे, स्वरा पवार, श्रावस्ती पवार, हर्षदा वीर, रिया बेनेरे, शौर्य सनगरे आणि विहान राऊत यांनी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर आपले विचार मांडत अभिवादन केले. त्यांच्या भाषणांतून शौर्य, स्वराज्य, सुशासन आणि रयतेप्रती असलेली बांधिलकी प्रभावीपणे व्यक्त झाली.
यावेळी वृत्तपत्रकार किशोर पवार यांनी शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविताना मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांनी राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज आणि रयतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या आदर्श कारभारावर सखोल मार्गदर्शन केले. किल्ले जिंकून स्वराज्य उभारणीपासून आदर्श समाजनिर्मितीपर्यंतच्या कार्याचा अभ्यासपूर्ण आढावा त्यांनी विविध ऐतिहासिक दाखल्यांसह मांडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांनी केले. शिस्तबद्ध आयोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे कळझोंडी नं.१ आदर्श शाळेतील शिवजयंती सोहळा संस्मरणीय ठरला.

