(चिपळूण)
चिपळूणमधील डायडाज दि इंटरनॅशनल डान्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप 2026 (सीझन 14) मध्ये टॉप 12 फायनलिस्ट म्हणून स्थान मिळवत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याचा मान उंचावला आहे.
ही प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धा 8 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत मुंबई येथे पार पडली. देशातील 26 राज्यांतून सुमारे 3000 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. डायडाज दि इंटरनॅशनल डान्स स्कूलचे विद्यार्थी “दि डायडाज स्क्वॉड” या नावाने या स्पर्धेत उतरले होते.
पहिल्या फेरीत दमदार सादरीकरण करत संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आणि पुढे टॉप 8 मध्ये स्थान निश्चित केले. अंतिम फेरीत अधीरा अभिजीत लाड, काव्या दीपक चव्हाण, आराध्या दीपक चव्हाण, पूर्वा ऋषांत जाधव आणि भक्ती ऋषांत जाधव या केवळ 13 वर्षांच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी नृत्य सादरीकरण करत टॉप 12 फायनलिस्टमध्ये आपली जागा पक्की केली.
अवघ्या दोन आठवड्यांच्या सरावात हे यश मिळवणे ही विशेष बाब ठरली आहे. या संपूर्ण सादरीकरणाचे कोरिओग्राफी आणि मार्गदर्शन डायडाज दि इंटरनॅशनल डान्स स्कूलचे संचालक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कोरिओग्राफर श्री. सुरज विलास जाधव यांनी केले.
स्पर्धेतील परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. आंतरराष्ट्रीय परीक्षक जॉन सर यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे तसेच डायडाज डान्स स्कूलच्या दर्जेदार प्रशिक्षणाचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारतभरातील विविध संस्कृती आणि कलागुणांचे दर्शन घडवणारी ही स्पर्धा ठरली. अशा मोठ्या राष्ट्रीय मंचावर चिपळूणच्या विद्यार्थ्यांनी आपली छाप पाडल्याने पालक, कला क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

