(रत्नागिरी)
लहान मुलांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क सुनिश्चित करणाऱ्या RTE (Right to Education) प्रवेश प्रक्रियेचा लाभ अधिकाधिक पालकांनी घ्यावा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आदेश (आबू) भाटकर यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील मुलांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवर पात्र मुलांना पूर्णपणे मोफत प्रवेश दिला जातो. महाराष्ट्र राज्यात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी RTE प्रवेश प्रक्रिया ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी राबवली जात आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे.
RTE प्रवेश प्रक्रियेची प्रमुख वैशिष्ट्ये :
- खाजगी शाळांच्या पूर्व-प्राथमिक किंवा पहिलीच्या वर्गात २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश
- वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
- अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, अनाथ व दिव्यांग बालकांना प्राधान्य
प्रवेशाची पद्धत :
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासली जातात.
आवश्यक कागदपत्रे :
जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (EWS साठी), निवासाचा पुरावा (रेशन कार्ड किंवा भाडेकरार), तसेच लागू असल्यास जात प्रमाणपत्र.
२०२६-२७ साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून १० मार्च २०२६ ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे पालकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता जवळच्या शाळेत किंवा संबंधित केंद्रात चौकशी करून आपल्या पाल्याचा ऑनलाइन अर्ज वेळेत भरावा, असे आवाहन श्री. भाटकर यांनी केले आहे.

