(राजापूर / रत्नागिरी)
तालुक्यातील मौजे सोल्ये येथे बेकायदेशीर मद्यविक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे स्थानकासमोरील चायनीज सेंटरच्या मागील बाजूस असलेल्या शेडमध्ये राजापूर पोलिसांनी छापा टाकून गोवा बनावटीच्या दारूच्या ४६ बाटल्या आणि महाराष्ट्र बनावटीच्या बिअरचे १२ टिन जप्त केले. ही कारवाई बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी रात्री करण्यात आली. याप्रकरणी नितीन राजाराम शिंदे (वय ५५, रा. सोल्ये, ता. राजापूर) याच्याविरुद्ध गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना सोल्ये परिसरात विनापरवाना आणि चोरीछुप्या पद्धतीने मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित शेडमध्ये छापा टाकला. यावेळी गोवा बनावटीच्या दारूच्या ४६ बाटल्या तसेच महाराष्ट्र बनावटीच्या बिअरचे १२ टिन आढळून आले. कोणताही अधिकृत परवाना नसताना मद्यसाठा करून त्याची विक्री केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या कारवाईमुळे सोल्ये परिसरातील अवैध मद्यविक्रीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.


