(पुणे)
पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणामुळे निर्माण झालेल्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. प्रकरण तापलेले असतानाच संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओमधील तिच्या वक्तव्यामुळे हे अपहरण आहे की प्रेमप्रकरण, यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या काही तासांतच या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले असून, संबंधित तरुणीने स्वतः एक व्हिडिओ प्रसारित करत अपहरणाचा दावा खोडून काढला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणीने आपण कोणत्याही दबावाखाली नसून स्वतःच्या इच्छेने संबंधित तरुणासोबत गेल्याचे स्पष्ट केले आहे. “माझे आणि त्याचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्याने माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत गेले आहे,” असे तिने सांगितले आहे. या वक्तव्यामुळे संपूर्ण प्रकरणाला ‘मोठा ट्विस्ट’ मिळाला आहे.
नेमके प्रकरण काय?
भिगवण परिसरात काही दिवसांपूर्वी भर चौकात तरुणीचे अपहरण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी तरुणीच्या आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांना मारहाण करण्यात आली आणि तरुणीला जबरदस्तीने नेण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. निषेधार्थ स्थानिक संघटनांनी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढला होता. यामुळे भिगवणमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भिगवणला भेट दिली. त्यांनी व्हायरल व्हिडिओवर संशय व्यक्त करत, “हा व्हिडिओ जबरदस्तीने बनवून घेतला आहे. मुलीचे लग्न काही दिवसांवर असताना तिचे अपहरण झाले आहे. कुटुंबीय आणि पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे,” असा खळबळजनक दावा केला. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
पोलिसांचा प्राथमिक तपास
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि तरुणीच्या कुटुंबाची ओळख पूर्वीपासून आहे. कॉल डिटेल रेकॉर्डनुसार 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारीदरम्यान दोघांमध्ये फोन आणि संदेशांची देवाणघेवाण झाली आहे. त्यांच्यामध्ये सातत्याने मेसेजद्वारे बोलणे होत होते. गेल्या महिनाभरात दोघांमध्ये किमान 21 कॉल्स झाल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुणाचे घर तरुणीच्या घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे. सध्या दोघेही पोलिसांच्या ताब्यात नाहीत.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासली जात असून, तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि इतर माहितीच्या आधारे हे प्रकरण अपहरण आहे की प्रेमप्रकरण, याचा अंतिम निष्कर्ष काढला जाईल. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

