(रत्नागिरी)
तालुक्यातील नातुंडे–मावळंगे येथे बुधवारी, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव दत्ताराम मारुती पाटील (वय ३६, रा. नातुंडे–मावळंगे) असे आहे. अज्ञात कारणामुळे त्यांनी आपल्या राहत्या घराच्या अंगणातील शेडमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

