(संगमेश्वर /प्रतिनिधी)
पूर्वीच्या तक्रारीचा आणि वादाचा राग मनात धरून पाच जणांनी एका ३७ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना देवरुख येथील तेलीवाडी परिसरात घडली. या हल्ल्यात तरुणाच्या उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित हरिश्चंद्र किर्वे (वय ३७, रा. तेलीवाडी, देवरुख) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रोहित किर्वे हे स्वतःच्या ताब्यातील मोटारसायकलवरून घरी जात होते. यावेळी नटेवाडी-हरपुडे ते तेलीवाडी मार्गावरील गणपती विसर्जन घाटाच्या पुढील बाजूस असलेल्या गल्लीमध्ये समीक्षा सतीश किर्वे व सुगंधा सुरेश किर्वे यांनी त्यांना अडवले. मागील तक्रारीचा आणि वादाचा राग मनात धरून त्यांनी लाकडी दांडक्याने रोहित यांच्या पाठीवर व मानेवर प्रहार केले.
दरम्यान, संशयित आरोपी सतीश सुरेश किर्वे, राजेंद्र सुरेश किर्वे आणि महेश सुरेश किर्वे हेही घटनास्थळी आले. त्यांनी लाकडी काठीने रोहित यांच्या कमरेवर, दोन्ही हातांवर आणि पाठीवर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांना जमिनीवर पाडून छातीवर लाथ मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन हाड फ्रॅक्चर झाले. या प्रकरणी समीक्षा सतीश किर्वे, सुगंधा सुरेश किर्वे, सतीश सुरेश किर्वे, राजेंद्र सुरेश किर्वे आणि महेश सुरेश किर्वे (सर्व रा. तेलीवाडी, देवरुख) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११७(२), १८९, १९०, १९१ आणि ३५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास देवरुख पोलीस करीत आहेत.


