(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी पेण रायगड या ठिकाणाहून आलेल्या पवार नामक पर्यटक कुटुंबीयांमधील आयांश या अडीच वर्षीय चिमुकल्याला समुद्राच्या पाण्यात बुडताना बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याला वाचविण्यात बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील भिवशी येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर प्रणाली हरदारे आणि गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर फोटोग्राफी व्यावसायिक म्हणून आणि गेल्या वर्षभरापूर्वी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचा जीवरक्षक म्हणून समुद्र किनारी काम केलेल्या रोहित चव्हाण हे खऱ्या अर्थाने देवदूत ठरल्याची भावना संपूर्ण गणपतीपुळे परिसरात व्यक्त केली जात आहे. मात्र, या चिमुकल्याचे वडील नितीन शंकर पवार हे अद्याप समुद्रात बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर शोध जयगड पोलीस आणि गणपतीपुळे येथील जीवरक्षक, स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थ घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी पेण रायगड जिल्ह्यातून आलेले नितीन शंकर पवार वय वर्षे 30 हे त्यांचे कुटुंबियांसमवेत गणपतीपुळे समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी त्यांनी आपला मुलगा आयांश याच्यासहीत समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला असता ते समुद्राच्या मोठ्या लाटांमध्ये अडकले. यानंतर त्यांनी आरडाओरडा केला असता समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या फोटोग्राफर व्यावसायिक रोहित चव्हाण यांचे लक्ष त्यांच्या दिशेने गेले असता त्यांनी क्षणाचा ही विलंब नव्हता न लावता आपल्या ताब्यातील फोटोग्राफीचे साहित्य दुसऱ्या सहकार्याकडे देऊन थेट समुद्रात उडी घेतली. यावेळी त्यांनी नितीन पवार यांचा अडीच वर्षाचा मुलगा आयांशला तातडीने पाण्याबाहेर काढले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या असलेल्या आयांश याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी स्थानिक व्यावसायिक ग्रामस्थ आणि पोलीस यंत्रणेने धाव घेतली.
मात्र याचवेळी समुद्रकिनाऱ्यावर देवदर्शन आणि पर्यटनाच्यानिमित्ताने आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील भिवशी येथील येथील डॉक्टर प्रणाली हरदारे ह्या देवदूतासारख्या उपचारासाठी धावून आल्या. त्यांनी ताबडतोब समुद्रात बुडालेल्या आयांशच्या छातीवर दाब देऊन त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढले तसेच आपल्या प्राथमिक उपचारांनी त्याला ताबडतोब शुद्धीवर आणून आयांशच्या कुटुंबीयांना घेऊन त्यांनी तात्काळ गणपतीपुळे येथील एका खाजगी रिक्षाने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले आणि त्याच्यावर त्या ठिकाणी वैद्यकीय उपचार करण्यासाठी तातडीने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे आयांश हा पूर्णपणे शुद्धीवर येण्यास मोठी मदत मिळाली.
एकूणच, आयांश याला समुद्रात बुडताना तात्काळ पाण्याबाहेर काढण्यासाठी फोटोग्राफर व्यावसायिक रोहित चव्हाण यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता दाखवलेला धाडसीपणा आणि आणि देवदूतासारख्या उपचारासाठी धावून आलेल्या डॉक्टर प्रणाली हरदारे यांचे लाख मोलाचे योगदान यामुळे आयांश या चिमुकल्याचा जीव वाचला आहे. मात्र त्याचे वडील नितीन पवार हे अद्याप गणपतीपुळे समुद्रात बेपत्ता असून त्यांचा युद्ध पातळीवर शोध सुरू सुरू असताना त्यांच्या चिमुकल्याचा जीव वाचल्याने खरोखरच जर हे दोन देवदूत धावून आले नसते तर निश्चितपणे खूप मोठा अनर्थ घडला असता अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. मात्र ह्या चिमुकल्याचा तरी जीव वाचवल्यामुळे पवार कुटुंबियांच्या दुःखाचे मोठे सावट कमी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसेच देवदूतासारख्या धावून आलेल्या डॉक्टर प्रणाली हरदारे आणि फोटोग्राफर व्यावसायिक रोहित चव्हाण यांचे विशेष कौतुक संपूर्ण गणपतीपुळे परिसरातून व्यवसायिक व ग्रामस्थ ग्रामस्थ आणि संस्था, संघटना व पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

