(मुंबई)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यास, संशोधन आणि दस्तावेजीकरणासाठी मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यात येणार आहे. हे केंद्र मुंबई विद्यापीठ अंतर्गत कार्यरत राहणार असून, सांस्कृतिक कार्य विभागाकडून यासाठी 50 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. ही माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी (18 फेब्रुवारी) दिली. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अभ्यास, संशोधन आणि वारशाचे शास्त्रशुद्ध दस्तावेजीकरण
या अध्यासन केंद्रामार्फत ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन, संशोधन प्रबंध, व्याख्यानमाला, युवा संशोधकांना मार्गदर्शन तसेच चारही किल्ल्यांच्या वारशाचे शास्त्रशुद्ध नोंदणीकरण केले जाणार आहे. शिवकालीन व्यापाराचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील ऐतिहासिक दाखल्यांचा सखोल अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा व्यापक प्रसार करण्यास हे अध्यासन महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.
गडावरील कार्यक्रमात झाली होती घोषणा
12 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याला 358 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार यांनी या अध्यासन केंद्राची घोषणा केली होती. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मालवणमधील विषयतज्ज्ञांच्या मदतीने सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर केला.
शासनाची अंतिम मंजुरी
प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून शासनाने या अध्यासनाची रचना निश्चित केली असून, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मुंबई विद्यापीठाला आवश्यक 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि संशोधनात्मक अभ्यासाला चालना मिळणार असून, भविष्यात देश-विदेशातील संशोधकांचेही लक्ष या भागाकडे वेधले जाण्याची शक्यता आहे.

