( मुंबई )
सोशल मीडियावरील रील्समधील खोटा रुबाब, ग्लॅमर आणि झगमगाट तरुणाईला भुरळ घालत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मोबाईल स्क्रीनवर दिसणारे आलिशान आयुष्य आपल्यालाही जगता येईल, या मानसिकतेचा फायदा घेत कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने तरुणांना गुन्हेगारीत ओढण्यासाठी सोशल मीडियावर थेट रील्सचा सापळा रचल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
ही बाब बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेले सात आरोपी २० ते ३० वयोगटातील तरुण असून, ते सर्व उत्तर भारतातील आहेत. सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि रील्स पाहूनच ते बिश्नोई टोळीकडे आकर्षित झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलीस यांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स (STF) सोबत संयुक्त कारवाई करत आरोपींना अटक केली. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
फेसबुक–इंस्टाग्रामवरून थेट संपर्क
पोलिस तपासानुसार, लॉरेन्स बिश्नोई गँग सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर त्यांच्या नावाने अनेक फॅन पेजेस चालवली जातात. या पेजेसवर टोळीतील गुन्हेगारांचे व्हिडीओ स्टाईल आणि स्वॅगमध्ये दाखवले जातात. काही व्हिडीओ थेट न्यायालय परिसरातून शूट केलेले असून, त्यांचा उद्देश तरुणांना आकर्षित करणे हाच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कबूल केले की, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून ते शुभम लोणकर आणि त्याच्या संपर्कात आले. “आपणही असेच दिमाखदार आयुष्य जगू शकतो” या मोहात पडून ते थेट गुन्हेगारी टोळीत सामील झाले.
गुन्हेगारीसाठी सोशल मीडियाचा उघड वापर
पूर्वीचे अंडरवर्ल्ड गँगस्टर गुप्तपणे काम करत असत. मात्र, बिश्नोई टोळी याच्या अगदी उलट पद्धतीने सोशल मीडियाचा उघडपणे शस्त्रासारखा वापर करत आहे. फॅन पेजेस, थेट मेसेजेस आणि व्हायरल रील्सच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याची रणनीती वापरली जात आहे.
कोणते रील्स होतात व्हायरल?
- हातात एके-४७ किंवा इतर शस्त्रे घेऊन फोटो
- लॉरेन्स बिश्नोईचे न्यायालयातील “स्टाईलिश” व्हिडीओ
- भगतसिंगांचे फोटो असलेले टी-शर्ट घालून पोस्ट
- हल्ला किंवा हत्येनंतर सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारणाऱ्या पोस्ट
या पोस्टना हजारो लाईक्स मिळतात. त्यानंतर अनेक तरुण स्वतःहून टोळीला मेसेज करून “आम्हालाही काम द्या” अशी इच्छा व्यक्त करतात.
कॅनडात सेटल होण्याचे आमिष
पोलिसांच्या माहितीनुसार, बिश्नोई टोळी गरीब पार्श्वभूमीतील किंवा कौटुंबिक अडचणी असलेल्या तरुणांना टार्गेट करते. भारतात गुन्हा केल्यानंतर कॅनडात पाठवून तिथे नवे आयुष्य देऊ असे आमिष दाखवले जाते. सोशल मीडियावरील झगमगाटी व्हिडीओ पाहून तरुण गुन्हेगारी जगात पैसा आणि सत्ता असल्याच्या भ्रमात अडकतात.
6,000 हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्स बंद
ऑक्टोबर 2023 मध्ये पंजाब पोलिसांनी केंद्र सरकारला कळवले होते की, बिश्नोई टोळीशी संबंधित 6,000 पेक्षा अधिक सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून मुंबई पोलीसही अशा अकाउंट्सवर सातत्याने लक्ष ठेवून कारवाई करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, एक अकाउंट बंद केले की लगेच दुसरे नवे अकाउंट तयार केले जाते. त्यामुळे सोशल मीडियावरून चालणारे हे गुन्हेगारी नेटवर्क कायमचे उद्ध्वस्त करणे मोठे आव्हान ठरत आहे.

