(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडये मधलीवाडी येथे एस.टी. बस व जेसीबी यांच्यात अपघात होऊन एस.टी. बसच्या समोरील भागाचे नुकसान झाले. या घटनेत बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसून मोठा अनर्थ टळला.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकुंश रामचंद्र साळवे (वय ३६, व्यवसाय चालक, सध्या रा. देवरुख सह्याद्रीनगर, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी; मूळ रा. राणी सावरगाव, ता. गंगाखेड, जिल्हा. परभणी) हे दि. १६/०२/२०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वा. त्यांच्या ताब्यातील एस.टी. बस (क्र. एम.एच.१४/बीटी/२७२१) ही कोंड्ये ते संगमेश्वर मार्गावर प्रवासी घेऊन येत होते. बसमध्ये त्यावेळी प्रवासी होते.
कोंडये मधलीवाडी येथे रस्त्याचे काम सुरू होते. जेसीबी (क्र. एम.एच.०८/बीई/७४७९) द्वारे रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीचे समतलीकरण सुरू असताना एस.टी. बस सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेला थांबविण्यात आली होती. मात्र, जेसीबी चालकाने मशीन मागे घेत असताना निष्काळजीपणाने एस.टी. बसच्या समोरील भागावर धडक दिली. त्यामुळे बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले.
जेसीबी एसटी बसवर धडकताच मोठा आवाज झाला. आणि बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा किरकोळ किंव्हा गंभीर दुखापत झाली नाही. घटनेची माहिती एस.टी. चालकांनी तत्काळ एसटी विभाग वरिष्ठ तसेच संगमेश्वर पोलीस ठाणे येथे दिली. त्यानुसार मोटार अपघात रजिस्टर दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ए. बी. वानरे (बकल क्र. १५४२) हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

